कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपविले जीवन   

कोटा : राजस्तानच्या कोटामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ची तयारी करणार्‍या एका १७ वर्षांच्या परीक्षार्थीने मंगळवारी पहाटे वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
 
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्याच्या खोलीत आढळली आहे. कौटुंबिक अथवा ‘नीट’ची तयारी हे त्याच्या आत्महत्येचे कारण नाही, असे पोलिसांनी सांगितले.हा विद्यार्थी बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहे. तो वर्षभरापूर्वी येथे एमबीबीएसच्या तयारीसाठी आला होता. तो कुन्हाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका वसतिगृहात राहत होता, अशी माहिती कुन्हाडी पोलिस स्टेशनचे अधिकारी अरविंद भारद्वाज यांनी सांगितले.
 
या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला होता. त्यानंतर, बहिणीने वसतिगृहात दूरध्वनी केला. वसतिगृहातील कर्मचार्‍याने खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला. त्यावेळी संबंधित विद्यार्थी खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
 
मृत विद्यार्थ्याच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येस कुटुंबास किंवा क्लास चालकास दोषी धरू नये, असे म्हटले आहे. तसेच, आपले नाव, कौटुंबिक तपशील किंवा छायाचित्र प्रसारमाध्यमांसोबत सामायिक करू नये अशी विनंती देखील केली आहे, असे भारद्वाज यांनी सांगितले. विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असेही ते म्हणाले.दरम्यान, देशातील कोचिंग हब असलेल्या कोटामध्ये यंदाच्या वर्षात विद्यार्थ्याने केलेली ही ११वी आत्महत्या आहे. गेल्या वर्षी ही संख्या १७ होती.
 

Related Articles